
नवसाला पावणारा राजा अशी ओळख असणाऱ्या लालबाग राजाच्या चरणी यंदा गणेशोत्सवात भाविकांनी विविध वस्तू अर्पण केल्या. या अर्पण केलेल्या सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा जाहीर लिलाव नुकताच पार पडला.

या लिलावाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातून मंडळाला तब्बल १ कोटी ६५ लाख ७१ हजार १११ रुपये इतकी विक्रमी रक्कम मिळाली आहे. अनेक भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने या वस्तू प्रसाद म्हणून खरेदी केल्या.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या लिलावात एकूण १०८ वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता.

या लिलावाचे मुख्य आकर्षण होते ते १० तोळ्यांचे सोन्याचे बिस्किट. ज्याचा लिलाव सर्वाधिक ११ लाख ३१ हजार रुपयांना झाला. या बिस्किटाव्यतिरिक्त, सोन्याच्या माळा, अंगठ्या, मोदक, गणपतीची मूर्ती आणि चांदीच्या वस्तूंचाही लिलाव चांगल्या किमतीत झाला.

या लिलावाच्या सुरुवातीला एका भाविकाने गणपतीची चांदीची मूर्ती ५१ हजार रुपयांना घेतली. तर, ३० हजारात मोदकांचा पिरॅमिड व ३१ हजारात मूषक, ४२ हजारात कलश, १ लाख ६६ हजारात सोन्याची चेन, ४१ हजार रुपयांत मोदकाचा लिलाव झाला.

यंदा लालबाग राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये बॅट, गदा, चांदीचे मोदक, लहान – मोठी समई, चांदीचा उंदीर, सोन्याचा मोदक, रत्नजडित चांदीचा लांब हार इत्यादींचा समावेश होता. ही लिलाव प्रक्रिया रात्री १० पर्यंत सुरु होती. हा लिलाव पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली आहे.

दरवर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीवर भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूंचा लिलाव केला जातो. या लिलावातून जमा होणारा निधी मंडळाच्या विविध सामाजिक कार्यांसाठी वापरला जातो.

यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो. या वर्षी मिळालेल्या विक्रमी निधीमुळे मंडळाच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा लिलाव फक्त आर्थिक मदत मिळवण्यापुरता मर्यादित नसून, तो भाविकांना राजाचा प्रसाद विकत घेतल्याचा आनंदही देतो, असे मंडळाने स्पष्ट केले.

गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करून मंडळाला किमान ७० लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती. यंदा या वस्तूंच्या लिलावातून किती रक्कम जमा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.