Ramayana: 44 वर्षांचा रणबीर, 42 वर्षांचा आदिनाथ कोठारे.. ‘रामायण’मध्ये दोघांची आई साकारणाऱ्या लारा दत्ताने वयाच्या चर्चांवर दिलं सडेतोड उत्तर
Ramayana: 'रामायण'मध्ये लारा दत्ता रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारे यांच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. रणबीरपेक्षा अवघ्या चार वर्षांनी मोठी असूनही आईची भूमिका साकारण्याबाबत लाराने स्पष्ट मत मांडलं आहे.

Ramayana: बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या वयावरून त्यांच्या भूमिकांची चर्चा अनेकदा रंगताना दिसते. विशेषतः अभिनेत्रींच्या बाबतीत वय आणि पडद्यावरील व्यक्तिरेखा यांचा संबंध जोडला जातो. मात्र, आता कलाकारही अशा जुन्या विचारसरणीच्या पलीकडे गेले आहेत, असं स्पष्ट मत अभिनेत्री लारा दत्ताने मांडलं आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या भव्य चित्रपटात लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारत आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटात ती अभिनेता रणबीर कपूर आणि मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या आईच्या भूमिकेत दिसतेय. रणबीर आणि लारा यांच्या वयात अवघ्या चार वर्षांचं अंतर आहे. तर आदिनाथ कोठारे हा लारापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. अशा परिस्थितीत दोघांची आई साकारताना तिला संकोच वाटला का? यावर लाराने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.
न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत लारा दत्ताला रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारे यांच्या आईची भूमिका साकारण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्ट सांगितलं की, तिला याबाबत अजिबात संकोच वाटला नाही. आज कलाकार अशा जुन्या विचारांमध्ये अडकून राहिलेले नाहीत. 'मी एक महिला कलाकार आहे, मग अमुक भूमिका कशी साकारू?' असा विचार करण्यापेक्षा आज कलाकार व्यक्तिरेखा जगण्यावर भर देतात. त्यामुळे या भूमिकेसाठी होकार देताना तिच्या मनात वयाच्या अंतराचा कोणताही विचार आला नव्हता, असं लाराने सांगितलं.
लाराने केवळ वयाच्या मुद्द्यावरच नव्हे, तर कैकेयी या व्यक्तिरेखेच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केलं. तिच्या मते, कैकेयीला समजून घेण्यासाठी रामायणातील संपूर्ण घटनाक्रम आणि तिचा भूतकाळ समजून घेणं महत्त्वाचं होतं. राजा दशरथ यांच्या तीन पत्नी होत्या आणि त्यांच्यात कैकेयी सर्वांत तरुण होती. त्यामुळे या व्यक्तिरेखेचा प्रवास समजून घेण्यासाठी लाराने दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत विशेष चर्चा केली.
कैकेयीने रामाला वनवासात पाठवण्यासाठी दोन वरदानं का मागितली? त्या वरदानांचं वचन कधी आणि कोणत्या परिस्थितीत देण्यात आलं होतं? कैकेयी नेमकी कोण होती आणि तिची पार्श्वभूमी काय होती? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तिने व्यक्तिरेखा साकारल्याचं सांगितलं. लाराच्या मते, कैकेयीसारखी महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका कलाकाराच्या कारकिर्दीत वारंवार मिळत नाही. त्यामुळे अशी संधी दोन्ही हातांनी स्वीकारायला हवी.