Photo : पहिल्यांदाच घडलं… मंत्रालयात प्रवेशासाठी अर्धा किलोमीटरची रांग; 700 ते 800 लोक वेटिंगवर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी; प्रवेशासाठी थेट अर्धा किलोमीटर पर्यंत लागली रांग.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आल्याने राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची मंत्रालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

आपल्या समस्या, तक्रारी आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून मंत्रालयाबाहेर सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात प्रवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजी प्रवेश (Digi Pravesh) ॲपवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या सुमारे 700 ते 800 नागरिकांची प्रतीक्षा यादी असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अनेकांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बराच वेळ थांबावे लागत आहे. विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित कामे, लोकप्रतिनिधींना भेटणे, निवेदने सादर करणे तसेच स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मंत्रालयात येत असतात.

याच कारणामुळे आज सकाळपासून मंत्रालय परिसरात गर्दी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालयाच्या गार्डन गेट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.