
सापांबद्दल अनेक कथा आणि समजुती प्रचलित आहेत. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की मेल्यानंतरही साप चावू शकतो, तर कदाचित तुम्ही हसाल. मात्र, आसाममधील तीन घटना या गूढाला आणखी गंभीर बनवतात. या घटनांनी वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. आसाममधील या तीन घटना एक इशारा आहेत. मृत सापाला कधीही हात लावू नका. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, साप मेल्यानंतर 3-4 तासांपर्यंत त्याचे विष घातक असू शकते.

आसाममधील शिवसागर जिल्ह्यात एका व्यक्तीने कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या कोब्राचे डोके कापले. नंतर जेव्हा तो सापाचे शरीर हटवायला गेला, तेव्हा कापलेल्या डोक्याने त्याच्या अंगठ्याला चावा घेतला. अंगठा काळा पडला, वेदना खांद्यापर्यंत पसरली. अँटी-व्हेनम दिल्यानंतर त्यांचा जीव वाचला.

एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरखाली चिरडून कोब्रा मेला. पण काही तासांनंतर जेव्हा शेतकरी ट्रॅक्टरवरून उतरला, तेव्हा मृत कोब्राने त्याच्या पायाला चावा घेतला. सूज आणि उलट्या झाल्याने त्याला 25 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.

कामरूप जिल्ह्यात लोकांनी ब्लॅक क्रेट सापाला मारून फेकून दिले. तीन तासांनंतर एका व्यक्तीने कुतूहलापोटी सापाला हातात उचलले आणि सापाने त्याच्या बोटाला चावा घेतला. सुरुवातीला काही परिणाम दिसला नाही, पण रात्री न्यूरोटॉक्सिनचा प्रभाव सुरू झाला. अस्वस्थ वाटणे, वेदना आणि बधिरपणा जाणवला. पण उपचारानंतर त्याचा जीव वाचला.

या घटनांवर युनिव्हर्सल स्नेकबाइट रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. एन.एस. मनोज म्हणाले, साप मेल्यानंतरही त्याच्या विषग्रंथी (venom glands) काही तास सक्रिय राहतात. जर चुकून त्या ग्रंथींवर दबाव पडला तर विष बाहेर येऊ शकते. सापाचा चावा अनेकदा मेंदूने नियंत्रित होत नाही, तर मणक्यापासून येणाऱ्या रिफ्लेक्समुळेही होऊ शकतो. हेच कारण आहे की मृत सापही चावू शकतात.

मेल्यानंतर साप आपल्या विषावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता गमावतो. जर त्याचे दात त्वचेत रुतले तर संपूर्ण विष एकाच वेळी बाहेर येऊ शकते. एलॅपिडे आणि व्हायपेरिडे सारख्या विषारी सापांमध्ये हा धोका जास्त असतो.