अलर्ट! हॉटेल रुमच्या ‘या’ वस्तूंमध्ये असू शकतो हिडन कॅमेरा; तुमच्या खासगी क्षणांना…
कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेल्यानंतर कपडे बदलण्यापूर्वी किंवा विश्रांती घेण्यापूर्वी खोलीची नीट तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अलार्म घड्याळे, चार्जर, स्विचबोर्ड, स्मोक डिटेक्टर किंवा आरशांमध्ये छुपे कॅमेरे लपवलेले असू शकतात. खोलीतील दिवे बंद करून अंधारात एलईडी लाईट किंवा मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने इन्फ्रारेड लाईट तपासून छुपे कॅमेरे शोधता येतात.

कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर विश्रांती करण्यापूर्वी थोडी काळजी घ्या. रुममध्ये गेल्यावर थेट कपडे बदलू नका. आधी हॉटेलच्या संपूर्ण खोलीत नजर फिरवा. हॉटेलात छुपे कॅमेरे कुठे लपवले जाऊ शकतात त्या जागा शोधा. म्हणजे तुम्हाला नको त्या अवस्थेत रेकॉर्ड केलं जाणार नाही. तसेच तुमच्या खासगी क्षणांना रेकॉर्ड केलं जाणार नाही, याची खात्री करून घ्या.
हॉटेलात कुठेही छुपे म्हणजे हिडन कॅमेरे असू शकतात. अलार्म घड्याळे, यूएसबी चार्जर, स्विचबोर्ड, प्लग पॉईंट, स्मोक डिटेक्टर, फोटो फ्रेम, आरसे आणि इतर सजावटीच्या वस्तूंमध्ये हे कॅमेरे असू शकतात. एखादी वस्तू संदिग्ध वाटत असेल, तिच्यात छोटी लेन्स असेल किंवा ती वस्तू ठेवण्याची जागा संशयास्पद वाटली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
एखाद्या वस्तूबाबत तुम्हाला संशय वाटला तर ती वस्तू तोडण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्या वस्तूचे फोटो काढा. व्हिडीओ काढा. जेणेकरून तो तुमच्याकडे पुरावा असेल. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापकाला आणि पोलिसांना त्याची माहिती द्या. जर तुम्हाला त्या खोलीत संशयास्पद वाटत असेल तर तात्काळ रुम सोडून दुसरीकडे जाणं योग्य ठरेल.
हिडन कॅमेरा शोधण्याची आणखी एक पद्धत म्हणजे रुममध्ये गेल्यावर आधी अंधार करा. काही इलेक्ट्रॉनिक वस्तूत लहान एलईडी किंवा इतर दिवे असतात. ते पाहा. अंधारात ते चमकतात. त्यामुळे तुम्हाला हिडन कॅमेरे रुममध्ये असल्याचं दिसून येतं. पण, प्रत्येक कॅमेऱ्यात दिवे दिसतीलच असे नाही.
काही कॅमेऱ्यात इन्फ्रारेड लाइट असते. काही स्मार्टफोन कॅमेरे ते पाहू शकतात. फोन कॅमेऱ्यानेही रुममधील कॅमेरे शोधले जाऊ शकतात. पण या प्रकाराने कॅमेरे शोधले जातीलच याची गॅरंटी नाही. पलंग आणि बाथरूमच्या दिशेने आरसा असेल तर वेळीच सावध व्हा. त्याच्या आजूबाजूला काही फटी तर नाही ना? हे शोधा. तसेच लहान भिंग तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे दिसतात का? हे सुद्धा बारकाईने पाहा.
बाथरूम किंवा बेडरूमसारख्या ठिकाणी तुम्हाला एखादं उपकरण आढळलं तर त्या जागी एक मिनिटही थांबू नका. ती हॉटेल तात्काळ सोडा. किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधा. कारण अशा ठिकाणी तुमची प्रायव्हसी धोक्यात आलेली असते. त्यामुळे हॉटेल सोडणं हाच एकमेव पर्याय असतो.
वैधानिक इशारा - या बातमीतील माहिती सामान्य स्त्रोतावरून, इंटरनेटवरून घेतलेली आहे. त्यात तथ्य असेलचल असे नाही, असेही नाही. या माहितीची टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.