डिलिमिटेशन चर्चेदरम्यान नितेश राणेंची एन्ट्री; थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागली, म्हणाले, औषधाचा परिणाम…
डिलिमिटेशन चर्चेदरम्यान नितेश राणेंची एन्ट्री झाली. डिलिमेटशनवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. राणेंनी ठाकरेंच्या व्हिपवर देखील टीका केली.

अनंत पाताडे, प्रतिनीधी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने फुटीर खासदारांना व्हिप जारी केला आहे. या व्हिपच्या माध्यमातून फुटीर खासदारांना विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिपने फुटीर अडचणीत सापडले आहेत. व्हिपचं उल्लंघन केल्यास फुटीर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. ठाकरेंच्या व्हिपवरून भाजप नेते, मंत्री नितशे राणे यांनी टीका केली आहे. त्यांच्यावर औषधाचा परिणाम होतोय, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.
नितेश राणे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या एमके स्टॅलिन यांच्या भेटीवर नितेश राणे म्हणाले, ‘ स्टॅलिन असतील की पवार साहेब यांनी देश हितासाठी भूमिका घेतली असेल, तर इंडिया आघाडीच्या लोकांना मिरची लागण्याचं काहीच कारण नाही. डिलिमिटेशन ही देशाची गरज आहे. पाकिस्तानची भूमिका आणि इंडिया अलायन्सची भूमिका ही आता एकच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक राहिलेला नाहीये’.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, ‘डिलिमिटेशन हे आज पहिल्यांदा झालेलं नाहीये. त्यांना डिलिमिटेशन का नको आहे? कारण का जसं लोकसभा ‘व्होट जिहाद’ करून जिंकले तसेच व्होट जिहाद करत राहायचंय. तसेच बांगलादेशी आणि रोहिंग्या आणायचे आणि म्हणून त्या लोकांना डिलिमिटेशन नको आहे. देशाचे हित पाहायचं नाहीये. पाकिस्तानवरून स्क्रिप्ट येते आणि राहुल गांधी वाचून दाखवतात, एवढंच आहे’.
ठाकरेंनी जाहीर केलेल्या व्हिपवर राणे म्हणाले, आता उद्धव ठाकरे यांची अवस्था काय झाली असेल हे विचार करा. जे खासदार त्यांचे राहिलेले नाहीत, ज्या खासदारांनी अधिकृत पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यांची खासदार म्हणून ओळख आज निवडणूक आयोगाकडे आहे. त्यांना अगर ते व्हीप जाहीर करत असतील तर मला वाटतं औषधाचा परिणाम होतोय’.
नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर देखील टीका केली. राज ठाकरेंकडे माईक तुम्ही घेऊन जाता, तुम्हाला वाटतं राज ठाकरे साहेबांनी काहीतरी बोलावं, ते बोलतात. पण शेवटी त्यांच्या बोलण्याला आता काही अर्थ राहिला आहे का? मी परत बोलतो, डिलिमिटेशन हा कुठला राजकीय विषय नाहीये, ही देशाची गरज आहे. लोकसंख्या वाढल्यानंतर जर आपण डिलिमिटेशन केलं नाही, तर मतदारांवर आणि जनतेवर अन्याय होतो’.
