Relationship Tips: तुमचं पार्टनरसोबतच नातं किती मजबूत आहे? स्वतःला विचारा ‘हे’ 4 प्रश्न, मिळतील महत्त्वाची उत्तरं
वैवाहिक नातं मजबूत राहण्यासाठी प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. तुमचं नातं किती घट्ट आहे, हे ओळखण्यासाठी स्वतःला विचारा हे ४ प्रश्न.

अनेक कपल्स लग्नापूर्वी बराच काळ रिलेशनशिपमध्ये असतात. या काळात एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी आणि वागणूक समजून घेण्याची संधी त्यांना मिळते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी नात्यातील आधीसारखा प्रेमळपणा आणि जवळीक कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. हळूहळू छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात आणि नात्यात असुरक्षितताही वाढते. अशा वेळी आपलं नातं नेमकं किती मजबूत आहे, हे समजून घेणं गरजेचं असतं. नात्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा टिकून आहे की नाही, हे तपासण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारून पाहा. या ४ प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्याची ताकद ओळखण्यास मदत करतील.
एकमेकांचा आदर
तुमचा जोडीदार कितीही कामात व्यस्त असला, तरी तो तुमच्याशी आदराने आणि प्रेमाने वागतो का, याचा विचार करा. तुमच्या भावना, मतं आणि निर्णयांना तो महत्त्व देतो का, तसेच तुम्हालाही त्याच्याबद्दल आदर वाटतो का, हे स्वतःला विचारा. नात्यात दोघांकडूनही एकमेकांचा आदर राखला जात असेल, तर नात्याचा पाया मजबूत असल्याचे हे महत्त्वाचे लक्षण आहे.
विश्वास महत्त्वाचा
प्रेम असो किंवा लग्न, कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. तुमचा तुमच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास आहे का आणि तो तुमच्याशी प्रामाणिक राहतो, अशी खात्री तुम्हाला वाटते का, हे स्वतःला विचारा. एकमेकांवर विश्वास असल्यास नात्यात विनाकारण संशय किंवा असुरक्षितता निर्माण होत नाही. मात्र, विश्वास कमी होत असेल तर संवाद साधून तो पुन्हा निर्माण करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नेहमी एकमेकांच्या बाजूने उभे राहणे
तुमचा पार्टनर नेहमी रोमँटिक पद्धतीने प्रेम व्यक्त करत नसेल, तरी प्रत्येक अडचणीच्या वेळी तो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो का, हे पाहा. तुमच्या समस्या समजून घेणे, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये साथ देणे आणि इतरांसमोर तुमची बाजू समजून घेणे या गोष्टी नात्यातील समजूतदारपणा दर्शवतात. दोघेही एकमेकांना गरजेच्या वेळी साथ देत असतील, तर तुमचे नाते भावनिकदृष्ट्या मजबूत आहे, असे म्हणता येईल.
एकमेकांपासून दूर राहणे कठीण वाटते
कितीही भांडण झाले किंवा मतभेद निर्माण झाले, तरी एकमेकांशी बोलल्याशिवाय किंवा संवाद साधल्याशिवाय राहवत नसेल, तर नात्यातील भावनिक जवळीक दिसून येते. रागाच्या भरात काही वेळ दूर राहावेसे वाटले, तरी पुन्हा एकमेकांशी बोलून वाद मिटवण्याची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. एकमेकांची काळजी वाटणे आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हे तुमच्या नात्यातील प्रेम आणि बांधिलकी दर्शवते.
