
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर सोनेरी अक्षरांनी कोरला जाणारा क्षण आला आहे. कास पठार आणि प्रतापगडानंतर आता महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणांना ‘युनेस्को’च्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

घनदाट जंगलं, थंड-स्वच्छ हवा, आणि दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सातारा येथील महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे.

१९८५ मध्ये कोयना अभयारण्याचा भाग म्हणून या भागाला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता, आणि आता ‘युनेस्को’कडून जागतिक नैसर्गिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे पर्यावरण संवर्धनाची नवी दारे खुली झाली आहेत.

महाबळेश्वर–पाचगणीला मिळालेला हा सन्मान, केवळ पर्यटनासाठी नव्हे तर पृथ्वीच्या इतिहासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं पान आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांना जागतिक ओळख मिळणार आहे.

सातारा येथील महाबळेश्वर–पाचगणी या भागातील भूस्तराची रचना, जैवविविधता यामुळे युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये नैसर्गिक वारसास्थळाच्या यादीत त्यांचा समावेश केलेला असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हटले आहे.