
दरवर्षी श्रावण महिन्यात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीने आनंद पोहण्याचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

आमणापूरपासून भिलवडी घाटापर्यंत कृष्णा नदीच्या पाण्यात हा कार्यक्रम झाला. ज्यात भिलवडीचे जवळपास ८० लोक सहभागी झाले. त्यांनी पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. यावेळी भिलवडीच्या लोकांनी ही जुनी परंपरा जपली.

कृष्णामाईला श्रीफळ अर्पण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भिलवडीतील नागरिकांनी याबद्दलच्या काही आठवणीही सांगितल्या आहे. पूर्वीच्या काळी ग्रामस्थ भिलवडीतून पोहण्यास सुरुवात करून अंकलखोप येथील पाणवठ्यावर पोहोचत असतं.

त्यांच्या स्वागतासाठी अंकलखोपचे नागरिक कडक चहा, भाजलेली मक्याची कणसे, हरभऱ्याचा हुरडा आणि शेकोटी पेटवून आतुरतेने वाट पाहत असत. हीच जुनी परंपरा सध्याच्या युवा पिढीनेही आनंदाने जपली आहे.

आमणापूर येथून भिलवडी कृष्णा नदी घाटाकडे पोहण्यासाठी निघालेल्या या जलतरणपटूंनी औदुंबर ते भिलवडी या कृष्णा नदीच्या तीरावरील निसर्गरम्य वातावरणासह महापुरात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

यामध्ये अवघ्या आठ वर्षांच्या लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. भिलवडी कृष्णा नदी घाटापर्यंतचे अंतर अवघ्या अर्धा ते पाऊण तासात पूर्ण केले.

या वेळी सर्वच जलतरणपटूंच्या चेहऱ्यावर एखादे मोठे युद्ध जिंकल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. या उपक्रमादरम्यान महापूर काळात भिलवडी परिसराचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे नितीन गुरव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी नितीन गुरव यांनी त्यांच्या यांत्रिक बोटीसह उपस्थित राहून पोहण्याच्या मार्गाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच काही जलतरणपटूंना सहकार्य केले.