
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात काही महत्वाची विधानं केली. सध्याची पूरस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी होत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस बोलले तसच उद्धव ठाकरे सतत मी कर्जमाफी केली असं सांगत असतात तो मुद्दा सुद्धा आकडेवारीसह मांडला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केलेली. 20500 कोटी रुपयांची ही कर्जमाफी योजना होती. त्याच्या तीन वर्ष आधी मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी 18762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20500 कोटीची कर्जमाफी केलेली, उद्धव ठाकरे यांनी काही वेगळं केलं असं नाही.

उलट उद्धव ठाकरेंनी 50 हजार रुपये नियमित कर्जधारकांना द्यायचे कबूल केलेले. अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळी आम्ही हे 5 हजार कोटी रुपये दिले, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आम्ही तर आता नुकसान भरपाईपोटी 18 हजार कोटी रुपये देतोय. खरडून गेलेली जमीन पकडली तर नुकसान भरपाईची ही रक्कम 21 हजार कोटी रुपये होते. आता कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याला थेट मदत करणं गरजेच आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कर्जमाफी केली तर शेतकरी आपल्या जमिनीवर माती कुठून आणणार, असा सवाल फडणवीस यांनी केला.

शेतकरी पुढच्या हंगामात पैसा कुठून आणणार?.आम्ही कर्जमाफी संदर्भात मागे हटलेलो नाही. पण आता थेट मदत देणं गरजेच आहे. ती मदत आता राज्य सरकारच्यावतीने करणार आहोत. शेतकरी कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिलेलं, ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आता आधी मदत करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.