
राज्यात आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित 'राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमा'त भाग घेतला. यावेळी दोघांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हुतात्मा चौक येथेही विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. महाराष्ट्र दिनानिमित्ताने हुतात्मा चौकात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांची राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली.

यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याने त्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.