
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईत पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी राज्यातील इतर भागांमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आहे.

मुंबईत गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसानंतर आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात केवळ रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याने रस्ते, रेल्वे, आणि हवाई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मिठी नदीची पाणी पातळीही कमी झाल्यामुळे क्रांतीनगर भागातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुंबई महापालिकेने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदत किंवा अधिकृत माहितीसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने मुंबई शहर, उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईला दिलासा मिळाला असला तरी वसई-विरारमध्ये मात्र अजूनही परिस्थिती गंभीर आहे. सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरू असल्यामुळे अनेक सोसायट्या आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

नालासोपारा, वसई, आणि विरारमधील पूर्व आणि पश्चिम दोन्ही भाग पाण्याखाली आहेत. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात दुपारपर्यंत कंबरेइतके पाणी साचले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

पुण्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे एकता नगर परिसरात पाणी शिरले असून, काही घरांमध्ये पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कल्याण शहराला उल्हास, काळु, आणि वालधूनी नद्यांच्या पुराचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरले असून, शहाड पुलाखाली पाणी साचल्याने कल्याण-टिटवाळा मार्ग बंद झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने, महापालिकेने ९५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पाऊस नसला तरी, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज तालुक्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीत, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.