
पुण्यात वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला चक्क गाडीसकट टेम्पोत भरले. समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात हा प्रकार घडला.

नो पार्किंगमध्ये बाईक उभी केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पद्धतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला जात आहे

ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाहन उचललं असतं तर ठीक पण वाहनासह चालकालाही उचललं जाण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत पुणेकर व्यक्त करत आहेत.

दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याला मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. त्यामुळे मुजोर पोलिसावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे काय कारवाई करणार? हे आता पहावे लागणार आहे.