
‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर आता एसएस राजामौली ‘वाराणसी’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू आणि हॉलिवूडची क्वीन प्रियांका चोप्रा ही जोडी पाहायला मिळणार आहे. दोन सुपरस्टार कलाकार एका चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. या चित्रपटाचे शीर्षक आणि महेश बाबूचा लूक अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली होती. दरम्यान, महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्या संपत्तीची तुलना केली जात आहे. चला, जाणून घेऊया दोघांपैकी कोण अधिक श्रीमंत आहे...

महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील प्रसिद्ध स्टार आहेत. तो साऊथ इंडस्ट्रीचा प्रिन्स म्हणूनही ओळखला जातो. अभिनेत्याने आपला करिअरची 1999 मध्ये ‘राजा कुमारुडू’ चित्रपटातून सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आज तो केवळ एक सुपरस्टार अभिनेताच नाही तर निर्माता म्हणून ही प्रसिद्ध आहे.

मीडियाच्या अहवालानुसार महेश बाबू एका चित्रपटासाठी 60 ते 80 कोटी रुपये फी घेतो. महेश बाबू चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो. हैदराबादमधील जुबली हिल्स या पॉश परिसरात त्याचा आलिशान बंगला आहे. अभिनेत्याकडे रेंज रोवर, मर्सिडीज बेंझ आणि ऑडी सारख्या अनेक गाड्या आहेत. त्याच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर ती 300 कोटी रुपये आहे. 2025 पर्यंतची अंदाजे नेट वर्थ 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंत आहे.

खूप कमी लोकांना माहीत असेल की प्रियांका चोप्राने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रसृष्टीतून केली आहे. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. बॉलिवूडमधील तिच्या अनेक भूमिका गाजल्या. तिने प्रेक्षकांची मने जिंकली. ती बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. आज अभिनेत्री हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवताना दिसत आहे.

प्रियांका चोप्राकडे महेश बाबूपेक्षाही जास्त संपत्ती असल्याचे म्हटले जाते. अहवालानुसार प्रियांका एका चित्रपटासाठी 30 ते 40 कोटी रुपये फी घेते. ‘वाराणसी’ साठी तिने 30 कोटी घेतले आहेत. प्रियांकाकडे फक्त मुंबई नाही तर न्यूयॉर्कमध्ये लक्झरी बंगला आहे. जिथे ती पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत राहते. अभिनेत्रीकडे मर्सिडीज बेंझ एस क्लास, पोर्श, ऑडी क्यू 7, बीएमडब्ल्यू 5 आणि रोल्स रॉयससारख्या लक्झरी कार आहेत.

एनडीटीव्हच्या एका अहवालानुसार प्रियांका चोप्राची नेट वर्थ सुमारे 650 कोटी रुपये आहे. ती चित्रपटांव्यतिरिक्त सीरीज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही खूप कमाई करते. 2025 पर्यंत तिची अंदाजे नेट वर्थ 80 मिलियन डॉलर (सुमारे 670 कोटी रुपये) आहे, ज्यात पती निक जोनाससोबत संयुक्त संपत्तीचा समावेश आहे. संपत्तीच्या बाबतीत महेश बाबूपेक्षा प्रियांकाची संपत्ती जास्त असल्याचे दिसत आहे.