
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्रा आणि राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो की नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळल्याने सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही.

राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं डोहाळ जेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरु होतात. रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो.

इंद्राणी आणि राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते. उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना त्या हातगाडीचं चाक निखळतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ते हातगाडी धरतं.

नेत्राला घेऊन जाणारी आणि अद्वैतच्या मदतीला धावून आलेली डॉक्टरचा वेश धारण केलेली त्रिनयना देवी आहे हे त्यांना दिसतं. ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते.

त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाशझोत पसरतो आणि नेत्रा जुळ्यांना जन्म देते. देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देत नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना मिळण्याची जी ताकद आहे ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असं सांगते. नेत्रा विरोचकाचा वध करते.

विरोचकाचा वध होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो. परंतु त्या रक्ताचाच एक थेंब प्रवाही दिसतो. काय असेल या मागचं रहस्य? ही कोणत्या नव्या संकटाची चाहूल आहे? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.