
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही अभिनेत्री मलायका अरोरा अत्यंत फिट आणि उत्साहपूर्ण दिसते. मलायकाचं फिटनेस आणि सौंदर्य हे अनेक तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देणारं आहे. योग, पालिटेस, जिम आणि डाएट या सर्व गोष्टींचं काटेकोर पालन करत मलायका स्वत:ला फिट ठेवते.

नुकतंच मलायकाने तिच्या रुटीनचा आणि डाएट प्लॅनचा खुलासा केला. त्याचसोबत तिने हेसुद्धा सांगितलं की संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मलायका काहीच खात नाही. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या फिटनेसचं गुपित सांगितलं आहे.

"मी सूर्यास्तानंतर काहीच खात नाही. माझं शेवटचं जेवण हे संध्याकाळी 7 वाजता असतं. त्यानंतर मी थेट दुसऱ्या दिवशी खाते. दुसऱ्या दिवशीही सकाळी उठल्यावर लगेच मी काही खात नाही", असं मलायका म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, "फक्त एक चमचा तूप मी आवर्जून उठल्यावर खाते. त्यानंतर दुपारी 12 वाजता मी पोटभर जेवते. यात भात, चपाती, भाजी असं सर्वकाही असतं. एका ठराविक वयानंतर तुम्हाला आरोग्याच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यानुसार आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं."

"विशेष म्हणजे मी कोणताच चीट डे (cheat day) पाळत नाही किंवा मी कधीच कॅलरी काऊंट करत नाही. मी फक्त आणि फक्त पोर्शन कंट्रोल करून जेवण्याला प्राधान्य देते. माझ्याकडे एक वाटी आहे. मी तेवढंच जेवते, त्यापेक्षा जास्त नाही", असंही मलायकाने स्पष्ट केलं.

"मी इंटरमिटंट फास्टिंगसुद्धा करते. माझ्यासाठी ते जादूप्रमाणे काम करतं. त्यामुळे माझी संपूर्ण सिस्टीम उत्तम होते. मला चांगली झोप लागते, उठल्यावर आळस किंवा जडपणा वाटत नाही. दर दोन दिवसांनी मी इंटरमिटंट फास्टिंग करते. फास्टिंग आणि डाएटिंग यात खूप फरक आहे. मी खाण्याच्या ठराविक वेळा पाळते. कधीही काहीही खात नाही", असं मलायकाने सांगितलं.