
गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे. या आंदोलनाला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून देणारच, असा निश्चिय जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. याच वेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तसेच एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली.

काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.

सुप्रिया सुळे यांनी मात्र सर्व आंदोलकांना नमस्कार केला. तसेच प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने सामोरे जात त्यांच्या भावनांचा आदर केला. या सर्व घटनेनंतर आता मनोज जरांगे नेमका काय संदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.