
मराठी-हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच लग्न आणि संसार टिकवण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तिने मुलांना संसार सुखी ठेवण्यासाठी एक खास आणि व्यावहारिक सल्ला दिला आहे. अमृता नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

एका मुलाखतीत अमृता खानविलकर लग्न, संसार आणि अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, "फक्त प्रेमावरच लग्न टिकत नाही. जर दोघेही कमावते असतील, दोघांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतील, तर प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे."

मुलांना संसार टिकवण्याची विशेष टीप देत अमृता म्हणाली, "मी मुलांना खूप नम्रतेने सांगते की, कृपया हे सर्व काही इगोवर घेऊ नका. ही गोष्ट तुमच्यासाठीच चांगली आहे."

अमृता पुढे म्हणाली, "आजकाल संवादाच्या अभावामुळे अनेक घटस्फोट होत आहेत. संवाद हे मानवजातीला मिळालेलं एक सुंदर वरदान आहे. प्राणी हे करू शकत नाहीत, पण आपल्याकडे डोके आहे, शब्द आहेत, बोलण्याची क्षमता आहे. फक्त खाणे-पिणे आणि वंश वाढवणे एवढेच नाही; आपण समाजाचा महत्त्वाचा भाग आहोत. म्हणूनच या गोष्टी इगोवर घेऊ नका. हे मुलांसाठीही तितकेच फायद्याचे आणि आवश्यक आहे."

अमृता मुलाखतीमध्ये म्हणाली की, "बोलून अनेक समस्या सुटतात. संवाद नसेल तर इगो येऊ शकतो. संवाद हीच संसार टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे."

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'नटरंग', 'चंद्रमुखी', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तिच्या या विचारसरणीमुळे ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर जीवनाबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.