
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आर्या यावेळी मात्र नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरी जात आहे.

विशेष म्हणजे तिच्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नाही तर एका साध्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नुकतीच आर्या आंबेकरने तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोद्वारे तिने चाहत्यांना आपल्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. मात्र, या पोस्टमधील कॅप्शन तिने इंग्रजी भाषेत लिहिल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.

फोटो शेअर करताना आर्याने लिहिलं होतं, '2016 मध्ये मी माझ्या पहिल्या सिनेमाचं शूट करत होते. तेव्हा आयुष्य हळूहळू चांगल्यासाठी बदलणार आहे याची कल्पनाही नव्हती. सतीश राजवाडे यांच्याबद्दल कायम कृतज्ञ आहे' असं तिने इंग्रजीमध्ये लिहिलं होतं.

या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी आर्याचे कौतुक केलं असलं तरी काही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'इंग्लिशमध्ये मजकूर लिहिल्याशिवाय आपण सेलिब्रिटी झालो आहोत असं वाटत नाही का?' मराठी कलाकार असून मराठीत पोस्ट का नाही? अशा कमेंट्स आर्याच्या पोस्टखाली पाहायला मिळत आहेत.

आर्या आंबेकर ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक अत्यंत लोकप्रिय गायिका देखील आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली होती. तिच्या अभिनयासोबत ती तिच्या सौंदर्याने देखील प्रचंड चर्चेत असते.