
कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.