
मासिक पाळीदरम्यान असंख्य महिला पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर करतात. परंतु विमान प्रवासादरम्यान महिलांनी मेन्स्ट्रुअल कपचा वापर करावा की नाही, यावरून एका महिलेनं सोशल मीडियावर इशारा दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, टिकटॉकवर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये एका महिला प्रवासीने फ्लाइटमध्ये मेन्स्ट्रुअल कप वापरणं धोकादायक असल्याचा दावा केला आहे.

संबंधित महिलेनं तिच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, मेन्स्ट्रुअल कपसारख्या उत्पादनांचा वापर हे केबिनच्या प्रेशरमुळे 30 हजार फूट उंचीवर चांगलं नसतं. महिलेच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचा पूर आला आहे.

महिला आरोग्य तज्ज्ञ डॉ. जेनिफर पेना यांनी 'द न्यूयॉर्क पोस्ट'ला सांगितलं की, विमानात मासिक पाळीदरम्यान मेन्स्ट्रुअल कपचा वापर सामान्यत: सुरक्षित आणि सोयीस्कर असतं.

याच बहुतांश लोकांना कोणतीही समस्या येत नाही. कारण मेन्स्ट्रुअल कप 12 तासांपर्यंत तुम्हाला संरक्षण देऊ शकतं. लांबच्या प्रवासासाठी ते उत्तम पर्याय ठरतं.

पेना यांच्या मते, केबिन प्रेशरमधील बदलांचा सहसा मेन्स्ट्रुअल कपच्या सीलवर कोणताही परिणाम होत नाही. परंतु काही लोकांना त्यामुळे थोडासा दाब किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतं.

मेन्स्ट्रुअल कपच्या वापरानंतर फ्लाइटच्या दाबामुळे महिलेला पोटात तीव्र वेदना होत असल्याचं महिला प्रवाशाने म्हटलं होतं. यावर पेना म्हणाल्या की, जर प्रवासापूर्वी मेन्स्ट्रुअल कप व्यवस्थित घातला नसेल तर अशा समस्या उद्भवू शकतात.