
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेवर सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यावर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

त्यावेळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आणि आसपासच्या परिसरात लाल रंग पडल्याचे आढळून आले. त्यासोबतच त्यांच्या पुतळ्यावरही रंग पडल्याचे पाहायला मिळाले.

ही माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक तात्काळ शिवाजी पार्क येथे जमा झाले. त्यांनी पुतळ्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. "हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही संस्कार नाहीत. पोलीस या विकृत प्रवृत्तीचा शोध घेत आहेत. सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे," असे ते म्हणाले.

दुसरीकडे, प्रवीण दरेकर यांनीही या घटनेचा निषेध केला. "मीनाताई ठाकरे एक आदरणीय व्यक्ती होत्या आणि त्यांच्या पुतळ्यावर अशाप्रकारे रंग फेकणे हे निंदनीय आहे. ही कृती विकृत मानसिकतेतून केली आहे की यामागे काही षडयंत्र आहे, याचा तपास पोलिसांनी करावा. कोणीही या कृतीचे समर्थन करणार नाही," असे ते म्हणाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, राजकीय वर्तुळातही यावर जोरदार चर्चा सुरू आहे.