
मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख यांनी नुकतंच नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. या भेटीमुळे भारत आणि मंगोलिया यांच्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.

मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख यांचे मंदिरात आगमन होताच मंदिरातील वरिष्ठ स्वामींनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि आदराने स्वागत केले. या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी मंदिराच्या पवित्र वातावरणात प्रार्थना केली. तसेच अभिषेक अनुष्ठानामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या अनुष्ठानामुळे त्यांना भारतीय अध्यात्माचा आणि परंपरांचा अनुभव घेता आला.

आपल्या भेटीची एक खास आठवण म्हणून राष्ट्रपती खुरेलसूख यांनी अक्षरधाम मंदिराला एक खास मंगोलियन काश्मिरी प्रिंट भेट म्हणून सादर केली. ही भेट दोन्ही राष्ट्रांच्या संस्कृतींचा आणि कलेचा संगम दर्शवते.

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान, राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख यांना बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे अध्यात्मिक प्रमुख, परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्याकडून एक वैयक्तिक पत्र प्राप्त झाले. या पत्रात राष्ट्रपतींसाठी आणि मंगोलियाच्या जनतेसाठी आशीर्वाद आणि प्रार्थना व्यक्त करण्यात आल्या होत्या. ज्यामुळे या भेटीला अधिक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.

अक्षरधाम भेटीनंतर राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताच्या जनतेचा संबंध जो गंगेच्या शांत आणि पवित्र प्रवाहासारखा सौम्य आहे आणि मंगोलियाच्या जनतेचे हृदय जे मंगोलियन गवताळ प्रदेशासारखे विशाल आहे हे दोन्ही संबंध हूण (हुनु) साम्राज्याच्या काळापासून जोडले गेलेले आहेत, असे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख म्हणाले.

आज मी या अद्भुत मंदिराचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदी आहे. हे मंदिर भारतीय जनतेचे अध्यात्मिकता, परंपरा, इतिहास आणि संस्कृती याचे सुंदर प्रतिबिंब आहे, असेही राष्ट्रपती उखनागीन खुरेलसूख यांनी सांगितले. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंध अधिक मजबूत झाले आहेत.