Mouni Roy’s Alimony: मौनी रॉयने मागितली तब्बल इतक्या कोटींची पोटगी? अखेर सत्य समोर
Mouni Roy's Alimony: अभिनेत्री मौनी रॉय तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आले. घटस्फोटानंतर तिने पती सूरज नांबियारकडे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागितल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चर्चांमागचं सत्य अखेर समोर आलं आहे.

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे चर्चेत आहे. अशातच तिने आणि तिचा पती सूरज नांबियार यांनी मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. यानंतर मौनीच्या पोटगीविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

घटस्फोटानंतर मौनी रॉयने पतीकडे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागितली आहे, दिशा पटानीमुळे त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्या.. अशा विविध चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या चर्चांवर अखेर सूरज नांबियाने मौन सोडलं आहे. सोमवारी इन्स्टा स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहित त्याने सर्वच स्पष्ट केलं आहे.

‘मौनी आणि माझ्या विभक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर ज्या तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अत्यंत वाईट पद्धतीच्या आणि द्वेषपूर्ण आहेत. याविषयी मी एकदाच आणि शेवटचं काय ते स्पष्ट सांगू इच्छितो. इथे कुठलीही पोटगी नाही, कोणताही वाद नाही. यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचाही दोष किंवा सहभाग नाही,' असं सूरजने स्पष्ट केलं आहे.

जानेवारी 2022 मध्ये सूरज आणि मौनीने थाटामाटात लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. यामागाचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी सोशल मीडियावर घटस्फोटाच्या कारणासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत.

‘मी हे स्पष्टपणे आणि शेवटचं सांगू इच्छितो की आम्हा दोघांविषयी किंवा आमच्यात तिसरी व्यक्ती असल्यावरून जे काही दावे केले जात आहेत, त्यात काहीच सत्य नाही. या प्रकरणात इतरांना ओढणं चुकीचं आहे. खासकरून निर्दोष मित्रमैत्रिणी, ज्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही’, असंही सूरजने स्पष्ट केलं आहे.