बुलेट ट्रेनच्या आधी, मुंबईत उभारला जाणार 70,000 कोटी रुपयांचा ‘पाताळ लोक’! 31 KM च्या बोगदा सोडवणार वाहतूक कोंडी?
Longest City Tunnel : सर्वात लांब शहरी बोगदा बांधला जाणार असून, शहराच्या मध्यभागातून 31 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची योजना आहे. विमानतळ आणि बाजारपेठांना भूमिगत बोगद्याने जोडले जाणार.

31 किमी लांबीचा बोगदा: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महाराष्ट्र सरकारच्या चर्चेनंतर शहरात 31 किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम मुंबई जोडणार: हा बोगदा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना थेट जोडणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील प्रवास अधिक सोपा होईल.
महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार: प्रस्तावित मार्गावर बांद्रा-वरळी सी लिंक, धारावी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बुलेट ट्रेन स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ला जोडणी मिळणार आहे.
एकूण 62 किमीचे बांधकाम: बोगद्याचा एका बाजूचा मार्ग सुमारे 31 किलोमीटरचा असेल. येण्या-जाण्यासाठी दोन्ही बाजूंचे मिळून एकूण 62 किलोमीटरचे बोगदे तयार करण्याचे नियोजन आहे.
प्रवासाचा वेळ होणार कमी: सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे 55 मिनिटांपासून 1 तास किंवा गर्दीच्या वेळी 2 तासांपर्यंत घेऊ शकतो. मात्र, प्रस्तावित बोगद्यामुळे हा प्रवास 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सरकारी मंजुरीची प्रतीक्षा: या प्रकल्पाचा मार्ग MMRDA कडून प्रस्तावित करण्यात आला असून, अंतिम सरकारी मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत पोहोचणे सोपे होण्यास मदत होईल.