
मुंबईकरांसाठी आजचा दिवस फारच खास असणार आहे.मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो एक्वा लाईन ३ (Metro Aqua Line 3) चा अंतिम टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

यामुळे आता प्रवाशांना वरळीपासून कफ परेडपर्यंत भूमीगत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. यामुळे मेट्रो लाईन ३ संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून या मेट्रोकडे पाहिले जात आहे.

मुंबई मेट्रो ३ मुळे आता कफ परेड ते आरे जेव्हीएलआर हे अंतर केवळ एक तासात कापणे शक्य होणार आहे. हा संपूर्ण मार्ग ३३.५ किमी लांबीचा आहे. मेट्रो एक्वा लाईन ३ ही आतापर्यंत तीन टप्प्यांत सुरू करण्यात आली आहे.

यातील आरे ते बीकेसी 12.69 किमीचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरु करण्यात आला. यानंतर 9 मे 2025 रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर आता अंतिम टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. आजपासून मेट्रो ३ चा वरळी नाका ते कफ परेड असा मार्ग सुरु होणार आहे. आजच्या लोकार्पणानंतर आरे ते कफ परेड असा 33.5 किमी लांबीचा हा संपूर्ण मार्ग पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.

आरे स्थानक वगळता या लाईनचा संपूर्ण मार्ग जमिनीखाली (भूमिगत) आहे. यामुळे शहराच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम न होता, मुंबईकरांना वेगवान प्रवास करणे शक्य होणार आहे.

या लाईनमध्ये एकूण 27 स्थानके आहेत. त्यापैकी 26 स्थानके अंडर ग्राउंड आणि अत्याधुनिक आहेत. ही लाईन दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांना जोडते.

कुलाबा, सीएसएमटी, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि सीप्झ (SEEPZ) अशी या मेट्रो स्थानकांची नावे आहेत.

दक्षिण मुंबईला याआधी कोणतीही मेट्रो सेवा नव्हती. त्यामुळे मंत्रालय आणि दक्षिण मुंबईत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. आता मात्र त्यांना मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे.

सद्यस्थितीत या मेट्रोच्या प्रवासाचे भाडे केवळ रु. 10 ते रु. 100 च्या दरम्यान ठेवण्यात आले आहे. जे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे आहे. या मेट्रो सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा चालवली जाईल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दररोज 280 फेऱ्या चालवण्याची तयारी पूर्ण केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि नियंत्रणासाठी आधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या मेट्रोच्या सर्व स्थानकांवर CCTV, डिजिटल साइन, फायर सेफ्टी आणि अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या अंतिम टप्प्याचे लोकार्पण होत असले तरी, पूर्ण मेट्रो सेवा 9 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

यामुळे दक्षिण मुंबईसह संपूर्ण मुंबईतील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार असून, दळणवळणाचा एक आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

सर्व फोटो - मुंबई मेट्रो - Twitter