
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजपासून ते पाणी पिणेही बंद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मात्र, सरकार लवकरच मनोज जरांगे यांना नवीन प्रस्ताव पाठवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही मराठा आंदोलकांनी मंत्रालयासमोर गाड्या अडवून घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. आयडी कार्ड नसलेल्यांना प्रवेश नाकारला जात आहे.

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सांताक्रूझ वाकोला उड्डाणपुलावर खड्ड्यात मोठा पॅच मारल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाकोला, विलेपार्ले आणि अंधेरीदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.