
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हसणाळा, रावनगाव, भासवाडी, भिंगेली या गावांना पुराचा वेढा पडला आहे. नांदेडमधील हसणाळा गावात अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

त्यासोबतच नांदेडमधील देगलूर-मुक्राबाद रस्त्यावर पुराचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे. रस्त्यावर असलेली एक कार पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तिला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सध्या एनडीआरएफची पथकं अत्यंत धोकादायक परिस्थितीत बचावकार्य करत आहेत. पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

या पुरात मोठ्या प्रमाणात गुरंढोरं दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या पूरग्रस्त नागरिक उपाशी आहेत. त्यासोबतच त्यांच्या बचावकार्यातही अडथळे येत आहेत.

नांदेड शहरातील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या नांदेड शहराच्या पुलाला पाणी टेकले आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने पुराचा धोका वाढला आहे. त्यासोबच विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून, 64,412 क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लवकरच आणखी दोन दरवाजे उघडले जाणार आहेत.

लेंडी नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हसनाळ गावात पाणी शिरले आहे. सध्या रावनगाव या ठिकाणी अंदाजे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.

त्यासोबतच भासवाडी गावात 20 नागरिक, तर भिंगेली गावात 40 नागरिक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत. या सर्व अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.