
सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच असतात. सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारा ट्रेंड म्हणजे 2016 मधील फोटो पोस्ट करण्याचा. दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो, हे दाखवणारा हा ट्रेंड आहे. या ट्रेंडअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'व्हायरल 2016 ट्रेंड'मध्ये सहभागी होण्याचा मोह 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकलाही अनावर झाला. तिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवक 2016 मधील तिचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत. गिरीजा 10 वर्षांपूर्वीही तितकीच सुंदर आणि साधी होती, हे या फोटोंमधून स्पष्ट होतंय.

2016 हे वर्ष गिरीजासाठी तिच्या 'दोन स्पेशल' या नाटकामुळे खास ठरलं होतं. याचा उल्लेख तिने फोटोंच्या कॅप्शनमध्येही केला आहे. या नाटकात तिने जितेंद्र जोशीसोबत काम केलं होतं. त्याच्याच काही खास आठवणी तिने शेअर केल्या आहेत.

'दोन स्पेशल' या नाटकाच्या टीमसोबतही तिने फोटो शेअर केले आहेत. गिरीजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो' असे गाण्याचे बोल लिहित नेटकऱ्यांनी गिरीजाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

गिरीजाची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर तिला 'नॅशनल क्रश'चा टॅग मिळाला. निळ्या साडीतली ही अभिनेत्री आहे तरी कोण, असा प्रश्न देशभरातील नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला होता.