चहा प्यायल्यानंतर पावडर फेकून देताय! तिचा घर स्वच्छ करण्यासाठी करा उपयोग
Used Tea Powder: चहा प्यायला अनेकांना आवडतो. चहा पिऊन झाला की, आपण चहा पावडर फेकून देतो... पण असं न करता चहा पावडचा उपयोग तुम्ही घर स्वच्छ करण्यासाठी करु शकता... जाणून खास टिप्स...

Used Tea Powder: अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चहा लागतोच… चहा प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं.. अशी अनेकांची समज आहे. पण चहा प्यायल्यानंतर चहा पावडरचं तुम्ही काय करता? अनेक जण वापलेली चहा पावडर फेकून देतात, पण त्याच चहा पावडरचा वापर तुम्ही घर स्वच्छ करण्यासाठी करु शकता. चहा पावडर वापरल्यानंतर, काही सोप्या पद्धतींनी चहा पावडरचा उपयोग घर स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा उपयोग आरसे, खिडक्या, लाकडी फर्निचर आणि स्वयंपाकघरातील काही वस्तू स्वच्छ करण्यासाठी करता येतो.
तर चहा पावडरचा कसा वापर करायला पाहिजे ते जाणून घ्या… सर्वप्रथम, चहा पावडर स्वच्छ धुवा. वापरलेली चहा पावडर थेट साफसफाईसाठी वापरू नये. जर त्यात दूध किंवा साखर शिल्लक राहिली असेल, तर पृष्ठभाग स्वच्छ होण्याऐवजी चिकट होऊ शकतो. त्यामुळे, शिल्लक राहिलेली चहा पावडर प्रथम स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा पूर्णपणे धुऊन घ्यावी. त्यानंतर, एका पातेल्यात दोन ग्लास पाण्यात एक ते दोन कप धुतलेली चहा पावडर उकळा. पाण्याचा रंग गडद होईपर्यंत उकळल्यानंतर, ते गॅसवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर, चहा पावडर गाळून घ्या आणि तयार झालेला द्रव एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.
आरसे आणि खिडक्या स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर होईल. तयार केलेलं चहा पावडरचं पाणी आरसा, खिडकी किंवा काचेच्या पृष्ठभागावर फवारून स्वच्छ सुती कापड किंवा वर्तमानपत्राने पुसता येते. यामुळे पृष्ठभागावरील सामान्य घाण आणि डाग साफ होण्यास मदत होते.
लाकडी फर्निचरसाठीही वापरता येते. तुम्ही जुन्या किंवा फिकट दिसणाऱ्या लाकडी फर्निचरवर या द्रवाची थोडीशी फवारणी करून मायक्रोफायबर कापडाने पुसून घेऊ शकता. चहाच्या पानांमधील टॅनिन लाकडाचा पृष्ठभाग उजळ करण्यास मदत करू शकतात.
भांड्यांवरील तेलकटपणा काढण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. जर एखाद्या पातेल्याला किंवा तव्याला तेल किंवा चिकटपणा चिकटला असेल, तर तुम्ही त्यावर थेट वापरलेली चहाची पाने चोळू शकता. यामुळे चिकटपणा आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
सिंक आणि फरशा स्वच्छ करण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही तयार केलेली चहा पावडर आणि पाणी किचन सिंकवर किंवा बाथरूमच्या फरशांवर शिंपडून सुमारे 10 मिनिटं तसेच ठेवू शकता. त्यानंतर, स्क्रबने घासून पाण्याने स्वच्छ धुवा.
म्हणून, रोज चहा बनवल्यानंतर उरलेली चहा पावडर कचऱ्यात टाकण्याऐवजी, तुम्ही तिचा वापर काही घरगुती साफसफाईच्या कामांसाठी पुन्हा करू शकता. मात्र, मोठ्या पृष्ठभागांवर वापरण्यापूर्वी, हा द्रव प्रथम घरातील एका लहान, सहज न दिसणाऱ्या भागात तपासून पाहणं योग्य ठरेल.