
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या राजकीय वारशाप्रमाणेच त्यांच्या संपत्तीची आकडेवारीही कायम चर्चेत असते. २०२० च्या प्रतिज्ञापत्रानुसार, शरद पवारांची एकूण संपत्ती ३२.७३ कोटी रुपये आहे.

शरद पवारांच्या एकूण संपत्तीतील ७७ टक्के वाटा जंगम मालमत्तेचा आहे. यात बँक ठेवी, रोख रक्कम, शेअर्स आणि दागिने यांचा समावेश आहे. त्यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. शरद पवारांच्या एकूण संपत्तीपैकी २५.२१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात ७.४६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध कंपन्यांचे शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचर्समध्ये गुंतवलेली आहे.

शरद पवारांची स्थावर मालमत्ता सुमारे ७.५२ कोटी रुपये आहे. यात शेतजमीन, बिगरशेती जमीन आणि मुंबई-पुण्यातील व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींच्या किमतीचा समावेश आहे.

शरद पवारांच्या या संपत्तीत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचाही मोठा वाटा आहे. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे ८८ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. तसेच, त्यांच्याकडे विविध बँक खात्यांमध्ये ९ कोटी रुपयांहून अधिक ठेवी जमा आहेत.

शरद पवारांकडे ८४८ ग्रॅम म्हणजे सुमारे ३८.१७ लाख रुपयांचे सोने आहे. तर १५.१७ किलो म्हणजे सुमारे ६.७० लाख रुपये मूल्य असलेली चांदी त्यांच्याकडे आहे. तसेच पत्नी प्रतिभा पवार पत्नी यांच्याकडे १९ लाख ५९ हजार ९७० मूल्याचे सोने आणि ७,५४,१११ किंमतीची चांदी आहे.

३२ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या शरद पवार यांच्यावर सुमारे १ कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. त्यांनी हे कर्ज अजित पवार यांच्या पत्नी आणि सून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून शेअर हस्तांतरणासाठी ॲडव्हान्स डिपॉझिट म्हणून घेतले होते.

अवघ्या ३८ व्या वर्षी राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी शपथ घेतली होती. त्यांचे केवळ राजकारणातच नाही तर शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांनी क्रिकेटसाठी बीसीसीआय व आयसीसी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

२०२४ मध्ये राष्ट्रवादीतील फुटीनंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या नावाने त्यांनी पक्ष पुन्हा उभा केला. आगामी काळात ते विरोधकांची मोट बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.