‘मला तुझ्यासोबत..’, माधुरी पवारच्या Video वर अत्यंत विचित्र घाणेरड्या कमेंट, सायबर पोलिसांत तक्रार दाखल
मराठी अभिनेत्री माधुरी पवारच्या इन्स्टाग्रामवरील Video वर प्रचंड अश्लील आणि घाणेरड्या कमेंट. वाचून तुम्हाला देखील येईल संताप. अभिनेत्रीने थेट सायबर पोलिसांत केली तक्रार.

अभिनेत्री माधुरी पवारला सोशल मीडिया अकाऊंटशी संबंधित धक्कादायक अनुभव आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट्स करण्यात येत असल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

या कमेंट्स सिस्टम जनरेटेड असल्याचा दावा माधुरीने केला असून, तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत माधुरीने या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे नोंदवली आहे.

“माझं अकाऊंट टार्गेट करण्याचा आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनावर आणि माझ्या प्रेक्षकांवर माझा विश्वास आहे,” असं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दहीहंडीच्या आधीही तिच्यासोबत अशाच प्रकारचा प्रकार घडला होता.

त्यावेळी माधुरीने शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावेळी परिस्थिती गंभीर असल्याने याबाबत बोलणं गरजेचं वाटल्याचं तिने सांगितलं. एका महिला कलाकाराबद्दल अशा पद्धतीने आक्षेपार्ह कमेंट्स करणं योग्य आहे का, असा सवालही माधुरीने उपस्थित केला आहे.

हा प्रकार नेमका कोण करत आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास होत असल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, माधुरीने हा प्रकार समोर आणल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्या पाठीशी उभं राहत पाठिंबा दर्शवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडून केला जात आहे.