वेब सीरिज असावी तर अशी.. ओटीटीवर येताच बनली नंबर 1; 6 एपिसोड्समध्ये दमदार कथा
नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दमदार कथानक असलेल्या या सीरिजचे एकूण सहा एपिसोड्स आहेत. ही सीरिज कोणती आहे, ते जाणून घ्या..

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात एक बहुप्रतिक्षित वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ओटीटीवर येताच ही सहा एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाल्यावर भारतीय हवाई दलाच्या 'गोल्डन एरोज' स्क्वाड्रनच्या सदस्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

'ऑपरेशन सफेद सागर' असं या सीरिजचं नाव आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये झालेल्या 1999 च्या कारगिल युद्धाची अज्ञात कहाणी या नव्या सीरिजमध्ये चित्रित करण्यात आली आहे. ही सीरिज भारतीय हवाई दलाचं शौर्य आणि पराक्रम दाखवते. तसंच देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचा गौरव करते.

या सीरिजमध्ये जिमी शेरगिल, सिद्धार्थ, अभय वर्मा, दिया मिर्झा आणि महेश मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 7 ऑगस्ट रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून तेव्हापासून तिला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिज तरुण वैमानिक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षांवरही प्रकाश टाकते.

या सीरिजचं शूटिंग पटियाला, पटौदी, नोएडा, नवी दिल्ली, मुंबई, मनाली, केलाँग, ग्वाल्हेर, गुरूग्राम, चंदीगड आणि बिकानेर या 11 शहरांमध्ये 115 दिवसांत करण्यात आलं. सीरिजच्या निर्मितीत 200 हून अधिक कलाकार, कर्मचारी सदस्य आणि 4000 रोजंदारी कामगारांचा समावेश होता. नेटफ्लिक्सने या सीरिजसाठी 15 भारतीय व्हीएफएक्स स्टुडिओंसोबत भागीदारी केली.

आनंद महिंद्रा यांनीसुद्धा या सीरिजचं कौतुक केलं आहे. कारगिल युद्धात भारतीय हवाई दलाची भूमिका आणि त्यांचं योगदान युद्धात कसं निर्णायक ठरलं, याची कथा प्रेक्षकांना या वेब सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे. यातील प्रत्येक गोष्ट भावनांच्या पलीकडे जाऊन अत्यंत तपशीलवारपणे चित्रित करण्यात आलं आहे.