
बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत कर्णची भूमिका साकारलेले अभिनेते पंकज धीर यांचं आज (15 ऑक्टोबर) निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'इंडिया फोरम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत पंकज धीर त्यांच्या लोकप्रियतेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले होते. माझ्या नावाने मंदिरं बांधली गेली आहेत आणि त्यात माझ्या मुर्त्यांचं, कर्ण या भूमिकेचं पूजन केलं जातं, असं त्यांनी सांगितलं.

"लोकांनी माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला. शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्येही जेव्हा कर्णाचा उल्लेख होतो, तेव्हा तिथे माझा फोटो असतो. त्यामुळे जोपर्यंत ही पुस्तकं छापली जातील, तोपर्यंत कर्ण म्हणून नेहमीच माझा संदर्भ दिला जाईल", असं ते म्हणाले होते.

"कर्नाल आणि बस्तर याठिकाणी माझी दोन मंदिरंसुद्धा आहेत. तिथे दररोज माझी पूजा केली जाते. मी स्वत: त्या मंदिरांमध्ये गेलो आहे. तिथे माझी आठ फूट उंची मूर्तीसुद्धा आहे. जेव्हा मी तिथे जातो, तेव्हा लोक माझ्यावर मनापासून प्रेम करतात", असं पंकज धीर यांनी सांगितलं होतं.

विशेष म्हणजे पंकज यांना सुरुवातीला अर्जुन या भूमिकेसाठी निवडलं गेलं होतं. परंतु त्यासाठी मिशी कापावी लागल्याने त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर त्यांना कर्णाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली. ही भूमिका माझ्या नशिबातच होती, असं ते म्हणाले होते.