
55 प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसेसमध्ये एरव्ही 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून तक्रारींचा पाढा सुरु आहे. जादा गर्दीने कंडक्टर आणि चालकाच्या सौजन्याला ही आता मर्यादा येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता न आल्यास त्यांचे पालक तक्रारी करीत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून शेगावातील एसटी चालक आणि वाहकांनी नियमानुसार काम आंदोलन सुरु केले आहे. आता नियमानुसार एसटीच्या क्षमतेनुसारच प्रवासी बसमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

आधीच शेगाव एसटी आगारामध्ये एसटी बसेसची कमतरता असून या बस स्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे अधिक गर्दी होत असते. येथील एसटी आगाराचे उत्पन्नही बऱ्यापैकी आहे.

दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये विद्यार्थ्यांकरीता एसटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र शेवटच्या स्टॉपपर्यंतचे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी आणि विद्यार्थी खालीच राहतात.त्यामुळे असे विद्यार्थी आणि प्रवासी नेहमीच या एसटी चालक वाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करताहेत.

वरिष्ठ अधिकारी कुठलीही सहनिशा न करता चालक वाहकांना जाब विचारतात. यामुळे त्रस्त होऊन चालक आणि वाहकांनी शेगावच्या बस स्थानकात अनोखे आंदोलन करून निषेध केला आहे.

साधारण एका एसटी बसेसची क्षमता 55 अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी आता एसटी बसमध्ये नेणार नसल्याची भूमिका कंडक्टर आणि चालकांनी घेतली आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने आम्हाला आता 55 प्रवाशांपेक्षा एकही जादा प्रवासी बसमध्ये न घेण्याची परवानगी घ्यावी. तसेच नवीन बसेसची संख्या तरी वाढवावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. शेगाव ते जळगाव तसेच शेगाव ते पातुर्डा या बसमधून जादाचे प्रवासी खाली उतरवून देण्यात येत आहेत.त्यामुळे शेगाव आगारात एसटी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.