
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर सध्या पावसाळ्याच्या आगमनानंतर निसर्गसौंदर्याने नटला आहे. सध्या सुरू असलेल्या संततधारेमुळे येथे फेसाळणारे धबधबे, हिरवाईने बहरलेल्या डोंगररांगा आणि धुक्याची नाजूक चादर निसर्गप्रेमींना वेड लावत आहे.

पावसाळ्यात पाटणादेवी हे ठिकाण एक वेगळीच जादू निर्माण करत असते. धवलतीर्थ व केदारकुंड हे परिसरातील प्रसिद्ध धबधबे दमदार पावसामुळे यंदा जून महिन्यापासूनच खळखळून वाहत आहेत. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांतून पाण्याचे ओघ सुरु झाला.

पाटणादेवी येथील सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत आहेत. हिरव्यागार वृक्षराजी, गवताळ पठारे आणि वाऱ्यावर झुलणारी झाडे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

पाटणादेवी अभयारण्य हा सुमारे ४२ किलोमीटर लांबीचा व ६,०३५ हेक्टरमध्ये पसरलेला परिसर आहे. यामध्ये अनेक दुर्मिळ वनौषधी, औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आढळतो. अभयारण्यात भास्कराचार्यांची ऐतिहासिक कुटी, प्राचीन लेणी, पाटणादेवीचे मंदिर आणि निसर्गरम्य अशी पर्यटनस्थळे आहेत.

धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी संगमामुळे हा परिसर संपूर्ण वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरत असतो. परंतु पावसाळ्यात पाटणादेवी परिसराचे सौंदर्य हे अधिकच खुलत असते.