
अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणं आणि त्यांचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणं, यात आश्चर्य ते काय? परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा त्याला अपवाद आहे. इथे चक्क रावणाची पूजा केली जाते.

रावणाच्या सद्गुणांमुळे इथं त्याची पूजा केली जाते. या गावात तब्बल 300 वर्षांपासूनची ही परंपरा आजही जोपासली जातेय. वाईट ते सोडावं आणि चांगलं ते घ्यावं अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांसाठी सांगोळ्यात त्याची पूजा करण्यात येते.

अकोला जिल्हातील पातूर तालुक्यातल्या वाडेगाव नजीक सांगोळा हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन दगडाची मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचं वैशिष्ट्य तसंच श्रद्धास्थानही आहे.

रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती. पण रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचं दर्शन होतं, असं इथल्या गावकऱ्यांचं मत आहे.

तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. हे रावणाचे मंदिर जिल्हातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव असल्याचं बोललं जातं.