देव दीपावलीसाठी वाराणसीला जाण्याचा प्लॅन करताय? ‘असा’ बनवा प्लॅन!
कार्तिक पौर्णिमेला साजरी होणारी देव दीपावली पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक वाराणसीमध्ये येतात. या दिवशी गंगेचे घाट हजारो दिव्यांनी उजळून निघतात. तुम्हीही यंदा देव दीपावलीसाठी वाराणसीला जाण्याचा विचार करत असाल, तर हा स्मार्ट ट्रॅव्हल प्लॅन बनवा.

देव दीपावळीच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत वाराणसीला पोहोचा. हॉटेलमध्ये चेक-इन करून थोडा आराम करा. संध्याकाळी अस्सी घाटावर जाऊन सूर्यास्ताचा आनंद घ्या आणि गंगा आरतीचा अनुभव घ्या.
देव दीपावळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगास्नान करा. त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जा. सकाळी लवकर गेल्यास गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते.
दिवसभर विश्रांती घ्या किंवा वाराणसीमधील स्थानिक स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या. सूर्यास्तापूर्वी गंगेच्या घाटावर किंवा बोटीवर पोहोचा. संध्याकाळी सुरू होणारा दीपोत्सव, हजारो दिव्यांनी उजळलेले घाट, गंगा आरती आणि आतषबाजीचा नजारा मनमोहक असतो.
देव दीपावळीच्या उत्सवानंतर तिसऱ्या दिवशी सारनाथला भेट द्या. वाराणसीपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सारनाथमध्ये धमेख स्तूप, चौखंडी स्तूप आणि पुरातत्त्व संग्रहालय पाहता येईल. त्यानंतर संध्याकाळी परतीच्या प्रवासाची तयारी करा.
देव दीपावळीच्या काळात वाराणसीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हॉटेल आणि बोटींचे दर वाढू शकतात. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी हॉटेल आणि बोटीचे बुकिंग आधीच करून ठेवा. घाटांपासून थोड्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये तुलनेने स्वस्त पर्याय मिळू शकतात.
देव दीपावळीच्या दिवशी गर्दीमुळे वाहतुकीवर निर्बंध असू शकतात. त्यामुळे बरेच अंतर पायी चालावे लागू शकते. आरामदायक शूज घाला. तसेच संध्याकाळी थंडी वाढत असल्याने सोबत जॅकेट किंवा उबदार कपडे ठेवा.