
दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये उतरले आहेत. काल रात्री पुत्र अमितसह राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले.

राज ठाकरे हे महायुतीमध्ये येऊ शकतात. त्याच संदर्भातील बोलणी करण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. राज ठाकरे यांची आज सकाळी सर्वप्रथम भाजपा नेते विनोद तावडे यांनी ताज मानसिंग हॉटेलमध्ये येऊन भेट घेतली.

राज ठाकरे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी ताज मानसिंग हॉटेलमधून रवाना झाले आहेत. महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीमध्ये आल्यास किती जागा मिळणार? विधानसभेला किती वाटा मिळणार? या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.

मुंबईतही वेगवान राजकीय घडामोडी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. तिथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी खासदारांची रेलचेल वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विद्यमान खासदार येत आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. कृपाल तृमाने, हेमंत गोडसे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. आज लोकसभेची यादी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे