
सुनिल ठिगळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी जुन्नर- पुणे | 19 फेब्रुवारी 2024 : आज 19 फेब्रुवारी... छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथं झाला, त्या किल्ले शिवनेरीवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते जन्मसोहळा संपन्न झाला.

किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांनी महाराजांसारखी वेषभूषा केली होती. शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

शिवनेरीवरील कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसंच पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... शिव छत्रपती म्हणजे युगपुरुष आणि युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केलं.शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांना अभिवादन केलं.