
मनोज लेले, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार राजन साळवी यांच्या घरावर तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. एसीबीकडून राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

राजन साळवी यांच्या घरी एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. तसंच राजन साळवी यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेल या ठिकाणी एसीबीकडून चौकशी केली जात आहे. झाडाझडती घेतली जात आहे.

या कारवाईवर राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. सूड भावनेने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचं राजन साळवी म्हणालेत.

जिल्ह्यातील लोक माझे आहेत. ते मला सांगत होते. कालच मला फोन येत होते. ही लोकं आलेली आहेत. रत्नागिरीतील अल्पा हॉटेलला थांबली आहेत. ती लोकं घरी येणार आहेत. याची मला माहिती होती, असं साळवी म्हणालेत.

माझी चौकशी करा. घरावर धाडी टाका. मला अटक करा. पण मी उद्धवसाहेबांना सोडणार नाही. काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार. त्यांची साथ कधी सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी सांगितलं.