
मराठी सिनेसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री अर्थात पूजा सावंतने 2024 मध्ये लग्न केलं. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. तरी लग्नानंतर पूजाने अभिनयविश्वास काम करणं सोडलेलं नाही. जवळपास वर्षभराच्या ब्रेकनंतर ती पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय झाली आहे.

पूजा लवकरच 'सालबर्डी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाली.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना पूजा म्हणाली, "ही लग्न कोणाबरोबर करेल, याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल होतं. मग माझे काही मित्र आहेत, त्यांच्यासोबत माझी नावं जोडली गेली." पूजाने 2024 मध्ये सिद्धेश चव्हाणशी अरेंज मॅरेज केलं.

इंडस्ट्रीत काम करताना अनेकदा तिचं नाव सहकलाकारांशी जोडलं गेलं होतं. कधी वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान तर कधी गश्मीर महाजनी.. यांच्यासोबत पूजाचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु त्या चर्चा कधीच खऱ्या नव्हत्या, असं तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

किंबहुना या चर्चांविषयी सिद्धेशनेही ऐकलंच असेल, त्याने माझ्याविषयी गुगल केलंच असेल, असंही ती म्हणाली. "त्या चर्चा कधीच खऱ्या नव्हत्या. आम्ही सगळे इतके छान मित्र होतो आणि माझं अरेंज मॅरेज झाल्याने सर्वच जण चकीत झाले होते. आता माझे मित्र हे आता सिद्धेशचे खूप चांगले मित्र झाले आहेत," असं पूजाने सांगितलं.