
'स्वराज्यरक्षक संभाजी' या तुफान गाजलेल्या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली.

प्राजक्ताचा विवाह हडपसर इथले सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ आणि ज्योतिषी, निर्माते, कलाकार आनंद पिंपळकर यांच्या हस्ते कन्यादान विधी पार पडला.

आनंद पिंपळकर यांनी काही चित्रपटांध्ये प्राजक्ताच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यामुळे चित्रपटातील नातं वास्तवात उतरण्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे ते भावूक स्वरात म्हणाले.

विधी दरम्यान आनंद पिंपळकर आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पिंपळकर यांचे डोळे पाणावले होते. "काही नाती रक्ताच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या अधिष्ठानाने जुळतात" असे मनोगत त्यांनी व्यक्त केलं.

प्राजक्ताचे आई-वडील तसेच मामा-मामी यांनीही कन्यादान विधीत सहभाग घेतला. "प्राजक्ताच्या रूपात आम्हाला लेकरू लाभले," असं अश्विनी पिंपळकर यांनी सांगितलं. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.