Prajakta Mali: प्राजक्ता माळीची कोट्यवधींची प्रॉपर्टी; मुंबईत फ्लॅट, पुण्यात ड्रीम होम अन् कर्जतमध्ये ‘प्राजक्तकुंज’
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रॉपर्टीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुण्यात घर आणि कर्जतमध्ये फार्महाऊस यानंतर तिने नुकतंच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या मुंबईतील नव्या घरामुळे चर्चेत आहे. अभिनय, सूत्रसंचालन आणि स्वत:चा दागिन्यांचा व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेल्या प्राजक्ताने गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. मुंबई आणि पुण्यातील घरांसह कर्जतमधील आलिशान फार्महाऊसदेखील तिच्या नावावर आहे.

प्राजक्ताने नुकताच मुंबईतील गोरेगाव परिसरातील ‘ओबेरॉय एक्स्विझिट’ प्रकल्पात आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी या घराचा व्यवहार नोंदवण्यात आला. 28व्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटचा कार्पेट एरिया 996 चौरस फूट असून, त्यासोबत सुमारे 240 चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची जागाही आहे. या घराची किंमत तब्बल 6.42 कोटी रुपये आहे.

मुंबईसोबतच प्राजक्ताने पुण्यातही स्वतःचं घर घेतलं आहे. 2023 मध्ये तिने पुण्यातील एका आलिशान इमारतीच्या 17व्या मजल्यावर फ्लॅट बुक केल्याचं सांगितलं होतं. या घरासाठी तिने खास नेमप्लेटही बनवून घेतली होती. पुणे हे तिच्या आवडत्या शहरांपैकी एक असून, तिचं कुटुंबही पुण्यात आहे.

प्राजक्ताच्या प्रॉपर्टी पोर्टफोलिओमधील सर्वात खास ठिकाण म्हणजे कर्जतमधील तिचं फार्महाऊस. ‘प्राजक्तकुंज’ असं नाव असलेल्या या फार्महाऊसमध्ये तीन बेडरूम, हॉल, किचन आणि स्विमिंग पूल असून यात एकावेळी 15 ते 20 जण राहू शकतात.

हे फार्महाऊस खरेदी करण्यासाठी मोठं कर्ज घेतल्याचं स्वतः प्राजक्ताने सांगितलं होतं. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची इच्छा आणि या घराच्या प्रेमात पडल्यामुळे बजेटचा विचार न करता निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. तिच्या प्रॉपर्टीबरोबरच ‘प्राजक्तराज’ या दागिन्यांच्या ब्रँडचीही ती मालकीण आहे.