Prawns Biryani : तोंडाला पाणी आणणारा मसालेदार प्रॉन्स पुलाव; एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल; रेसिपी पाहा
रविवारच्या जेवणासाठी काहीतरी खास मांसाहारी बनवायचं असेल, तर खमंग कोळंबी पुलाव हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ताजी कोळंबी, घरगुती सुगंधी मसाला, हिरवी पेस्ट, पुदिना आणि कोथिंबिरीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंटस्टाइल कोळंबी पुलाव बनवू शकता. कोळंबी कडक न होता मऊ राहावी आणि मसाल्यांची चव भातात छान मुरावी यासाठी जाणून घ्या ही सोपी रेसिपी आणि खास टिप्स!

साहित्य: अर्धा किलो कोळंबी, २० मिनिटे भिजवलेले २ कप तांदूळ, साडेतीन कप पाणी, बारीक चिरलेले २ छोटे कांदे, बारीक चिरलेला १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १० ते १२ काजू, बिर्याणीची पाने – २, शहाजिरा – अर्धा चमचा, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, ताजा पुदिना, थोडी कोथिंबीर, २ मोठे चमचे शुद्ध तूप, खाण्याचे तेल. सुवासिक पुलाव मसाला पावडरसाठी: १ मोठा चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा शहाजिरा, अर्धा चमचा बडीशेप, ३ वेलची, ५ ते ६ लवंगा, चिमूटभर दालचिनी, १ चमचा मेथी. ताज्या हिरव्या मसाल्याच्या पेस्टसाठी: १५ ते २० लसणाच्या पाकळ्या, दीड इंच आल्याचा तुकडा, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीची लहान जुडी.
कृती: अर्धा किलो स्वच्छ केलेली कोळंबी, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, १ चमचा तिखट घालून चांगले मिसळा आणि १० मिनिटे बाजूला ठेवा. गॅसवर एक पातेले ठेवून १ चमचा तेल गरम करा आणि त्यात कोळंबी घाला. कोळंबीमधील पाणी काढून टाका. सर्व पाणी आटेपर्यंत आणि तेल वर तरंगू लागेपर्यंत ३-४ मिनिटे तळून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
मिक्सरच्या जारमध्ये धणे, जिरे, शहाजिरा, बडीशेप, वेलची, वेलचीच्या शेंगा, लवंग, दालचिनी आणि बडीशेप घालून बारीक पूड करून बाजूला ठेवा. त्याच जारमध्ये लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या आणि देठांसकट कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून बारीक हिरवी पेस्ट बनवा. पुलाव बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात २ मोठे चमचे तूप आणि १ मोठा चमचा तेल गरम करा. त्यात बिर्याणीची पाने, अर्धा चमचा शहाजिरा आणि चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा अर्धवट शिजल्यावर त्यात काजू घालून सोनेरी रंगाचे होईपर्यंत परता.
आता आले-लसूण-कोथिंबीर वाटून केलेली पेस्ट, चिरलेले टोमॅटोचे तुकडे घालून तेल सुटेपर्यंत परता. नंतर तळलेले कोळंबी, १/४ चमचा हळद, चवीनुसार मीठ, १ चमचा तिखट आणि तयार केलेला मसाला घाला. मसाले जळू नयेत म्हणून २ चमचे पाणी घाला, झाकण ठेवून मंद आचेवर २ मिनिटे परता.
भिजवलेल्या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून टाका. मसाल्यामध्ये फक्त तांदूळ घालून २ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. आता २ ग्लास तांदळासाठी साडेतीन ग्लास पाणी घाला (बासमती तांदूळ असल्यास ३ ग्लास). तांदळानुसार मीठ, ताजी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घाला आणि मीठ तपासा. गॅसची आच मोठी करून झाकण ठेवा आणि उकळी येऊ द्या. एकदा सर्व पाणी शोषले गेले आणि तांदूळ जवळजवळ शिजला की, गॅसची आच मंद करून झाकण ठेवा आणि ५ ते ६ मिनिटे शिजू द्या. चमच्याने तपासल्यावर त्यात अजिबात ओलावा राहणार नाही आणि तो कोरडा निघेल, तेव्हा गॅस बंद करा. बस्स, तुमचा तोंडाला पाणी सुटणारा, रेस्टॉरंटच्या दर्जाचा 'श्रिंप पुलाव' तयार आहे! सोबत कोणताही पदार्थ नसला तरी, गरमागरम खाल्ल्यास तो स्वादिष्ट लागेल; आणि जर तुम्ही मुलांसाठी थोड्या कांद्याच्या दह्याच्या रायत्यासोबत दिलात, तर ते तो मोठ्या आवडीने खातील!