
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री कृती खरबंदा हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दिल्लीच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये पुलकित आणि कृतीचं धूमधडाक्यात लग्न पार पडणार आहे. हे दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पुलकितचं पहिलं लग्न श्वेता रोहिराशी झालं होतं. तीसुद्धा एक अभिनेत्री असून सलमान खानशी तिचं खास नातं आहे. श्वेता ही सलमानची मानलेली बहीण आहे. ती दरवर्षी न चुकता सलमानला राखी बांधते.

पुलकित आणि श्वेताचं लग्न 2014 मध्ये धूमधडाक्यात पार पडलं होतं. मात्र लग्नाच्या वर्षभरातच या दोघांच्या नात्यात कटुता आली. एका मुलाखतीत श्वेताने याविषयीचा खुलासा केला होता.

श्वेता म्हणाली होती, "पुलकितने मला सांगितलं की तो त्याच्या कुटुंबामुळे मला घटस्फोट देतोय. कुटुंब हे आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याला जे हवंय ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे जेव्हा त्याने घटस्फोटाची मागणी केली, तेव्हा ती गोष्टसुद्धा मी त्याला देऊन टाकली."

श्वेता आणि पुलकितच्या घटस्फोटादरम्यान त्याच्या विवाहबाह्य संबंधाचीही जोरदार चर्चा होती. अभिनेत्री यामी गौतममुळे पुलकितने पत्नीला घटस्फोट दिल्याचं म्हटलं जातं. मात्र त्यावेळी पुलकितने या चर्चांना फेटाळलं होतं. श्वेताने गर्भपाताचा खुलासा करताना यामीवर गंभीर आरोप केले होते.

दुसरीकडे पुलकितने श्वेताचे आरोप फेटाळले होते. “यामी या सगळ्यात कुठेच नव्हती. गर्भपाताविषयी जेव्हा मी आर्टिकल्स वाचले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण ही आमच्या दोघांची खासगी गोष्ट आहे," असं तो म्हणाला होता.

घटस्फोटादरम्यान कोर्टाबाहेर पुलकितचा राग अनावर झाला होता. आपल्यावरील विविध आरोप ऐकून त्याचं रागावरील नियंत्रण सुटलं आणि त्याने एका फोटोग्राफरला मारलं. त्याचा कॅमेरासुद्धा पुलकितने पाडला होता.

श्वेताने माझी प्रतिमा मलिन केल्याचा आरोप पुलकितने केला होता. सतत होत असलेल्या ट्रोलिंगला वैतागून त्याने ट्विटर अकाऊंटसुद्धा बंद केलं होतं. पुलकित आणि क्रिती हे गेल्या चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘पागलपंती’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.