
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अपघाताच्या ब्लॅक स्पॉटवर सध्या चर्चा सुरु आहे. पुणे शहरात २१ ब्लॅक स्पॉट तर जिल्ह्यात ६२ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी मोठा अपघात झाला.

सासवड - जेजुरी पालखी महामार्गावर रिक्षेचा अपघात झाला. या मार्गावर खळद बोरावके मळा येथील विहिरीत रिक्षा पडली. चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रिक्षा विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसींनी क्रेन मागवून रिक्षा बाहेर काढण्याचे काम सुरु केले. यावेळी रिक्षेत बसलेल्या प्रवाशांनाही बाहेर काढले गेले.

रिक्षेत बसलेल्या दोघांना जिवंत बाहेर काढण्यात पोलिसांनी यश आले. परंतु रिक्षेतील तीन जण अद्यापही विहिरीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी पोलिसांना ग्रामस्थही मदत करत आहे.

रिक्षेतील प्रवाशांची नावे मिळाली नाही. परंतु प्रवास करणाऱ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले एक नवविवाहित दाम्पत्य असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. रिक्षेचा अपघात नेमका कसा झाला? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.