
अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 18 फेब्रुवारी 2024 : अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे. त्या निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. गडावरून शिवज्योत घेऊन शिवभक्त आपआपल्या गावी जात असतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवप्रेमींना आवाहन केलं आहे.

सिंहगडावरून अनेकशिवभक्त शिवज्योती नेत असतात. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी शिवज्योत घेऊन जाण्यासाठी हजारो शिवभक्त, शिवप्रेमी सिंहगडावर येतात. त्या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांच्या वतीने आदेश देण्यात आले आहेत.

शिवज्योत घेऊन जाताना जरा भान बाळगा, असं आवाहन पोलिसांनी केलंय. सिंहगडावरून शिवज्योती साठी येणाऱ्या शिवभक्तांना पोलिसांच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचं पालन करून एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

मोटरसायकलचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज करताना आढळल्यास कारवाई केली जाईल.काही जणांच्या हातात तलवारी, कोयते असतात. त्या माध्यमातून गोंधळ करण्याचा प्रयत्न करत असतात. असा प्रकार आढळल्यास हवेली पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.