
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे सुरुवातीला खूप संघर्ष करतात आणि हळूहळू मेहनतीच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरतात. अशा कलाकारांमध्ये अभिनेता राहुल देवचं नाव आवर्जून घेतलं जातं. राहुल त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला.

राहुलने नकारात्मक भूमिका साकारत अभिनयविश्वात जम बसवला. त्याचा जन्म 27 सप्टेंबर 1968 रोजी दिल्लीत झाला आणि तिथेच त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्याचे वडील पोलीस उपायुक्त होते. त्यामुळे घरात अत्यंत शिस्तीचं वातावरण होतं.

राहुलने 2000 मध्ये 'चॅम्पियन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. नकारात्मक भूमिका असूनही राहुलच्या कामगिरीचं खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर हळूहळू तो बॉलिवूडमधल्या दमदार खलनायकांच्या यादीत सहभागी झाला.

2009 मध्ये राहुलची पत्नी रीना देवचं कॅन्सरने निधन झालं. पत्नीच्या निधनाने तो खूप खचला होता. अशा कठीण काळात त्याने एकट्यानेच मुलाचं संगोपन केलं. त्यानंतर त्याची भेट मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेशी झाली. मुग्धा राहुलपेक्षा वयाने 18 वर्षांनी लहान आहे.

राहुल आणि मुग्धा 2013 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मुग्धा गोडसेबद्दल बोलायचं झाल्यास ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अजय देवगण, संजय दत्त यांच्यासोबत काम केलंय. 'फॅशन' या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.