
सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. पावसात अनेकदा गरमागरम भजी, वडा, समोसे खाण्याची इच्छा होते आणि मग एखाद्या वडापावच्या गाडीवर उभं राहून या पदार्थांवर ताव मारला जातो. पावसाळ्यात हे पदार्थ खाण्याचा मोह आवरताही येत नाही. पण यामुळे तुम्हाला अनेकदा पोटाचे विकार बळावतात.

पावसाळ्यात गरमागरम भजी किंवा वडा खाऊन झाल्यावर पोटं बिघडलं तर मग मोठी पंचाईत होते. मग अशावेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही नक्कीच आराम मिळवू शकता.

आले - आल्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. पोट खराब झाल्यास, तुम्ही 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या. हे पोटदुखी, उलट्या आणि गॅसवर खूप प्रभावी ठरते.

जिरे पचनासाठी खूपच उपयुक्त असते. यामुळे गॅस आणि पोटदुखी कमी होते. जर तुमच्या पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही जिऱ्याचा काढा बनवून प्या. यासाठी 1 चमचा जिरे भाजून ते 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते कोमट करुन प्या.

दही आणि हिंग - फूड पॉयझनिंगमुळे पोटात सूज येते. अशावेळी दही आणि हिंग यापासून तुम्हाला नक्कीच आराम देऊ शकतात. यासाठी ½ कप ताज्या दह्यात चिमूटभर हिंग आणि सैंधव मीठ मिसळून खा.

लिंबू आणि ओआरएस - उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. अशावेळी लिंबू आणि ओआरएससारखे घरगुती उपाय शरीराला पुन्हा हायड्रेट करतात. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर मिसळून प्या.

धणे थंड असतात. यामुळे पचन सुधारते. यामुळे देखील पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही फक्त 1 चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

पुदिना पोटाला थंडावा देतो आणि काळीमिरीमुळे पचन सुधारते. पोट खराब झाल्यास तुम्ही यांचेही सेवन करू शकता. यासाठी 5-6 पुदिन्याची पाने, चिमूटभर काळी मिरी आणि थोडे लिंबाचा रस एकत्र करून घ्या.